भामरागडमध्ये १४ गावातील ४०० आदिवासी महिलांचा " मि कुर्मा घरात राहणार नाही " कुप्रथा न पाळण्याचा निर्धार
गडचिरोली : सत्याचे प्रयोग-२’ हे शिबीर २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भामरागडमध्ये संपन्न झाले. गडचिरोलीत काही आदिवासी समुदायात असणाऱ्या कुर्माप्रथेत सकारात्मक बदल व्हावेत, यासाठी समाजबंधने एप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील १८ गावात पहिलं आठ दिवसीय निवासी शिबीर राबवलं होतं. यावेळी त्यातील १४ गावांमध्ये हे दुसरं शिबीर राबवण्यात आलं. ऐन दिवाळीच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अक्षरशः जनरलच्या डब्यातून प्रवास करत १३ जिल्ह्यातून समाजबंधचे एकूण २५ कार्यकर्ते स्वखर्चाने शिबीरात सहभागी झाले होते.
सात महिन्यांपूर्वी म्हणजे पहिल्या शिबिराच्या आधी कुर्माप्रथेमध्ये बदल करणं, जितकं अवघड वाटत होतं, तितकं ते नक्कीच नाही, हे या शिबिरात समजलं. कुर्माघर म्हणजे पाळीच्या काळात महिलांनी घराबाहेर राहण्याची अस्वच्छ, अंधारी, असुरक्षित, लहानशी झोपडी. हेच आपलं जगणं आहे, हे मान्य करून याविषयी आम्हा कार्यकर्त्यांसोबत बोलायचं सोडाच पण ऐकायला ही तयार नसणाऱ्या महिला आता याविरोधात उघडपणे पंच मंडळींसमोर बोलू लागल्या आहेत. यावेळी खेळ, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
मासिक पाळी आणि इतर सामाजिक विषयांवर निबंधलेखन,चित्रकला,वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आयोजित करत किशोरवयीन आणि युवांना बोलतं करण्यात आलं. या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत महिला आणि किशोर यांची गावागावातून प्रभातफेरी काढण्यात आली. कुर्माप्रथेवर नेमकं भाष्य करणारे नाटक दिवाळीनिमित्त असणाऱ्या कार्यक्रमात गावातील मुलींनी सादर केले. या सर्व स्पर्धांमधील विजेते आणि सहभागी लोकांना बक्षीस म्हणून लोकांकडून देणगीत मिळालेले नवे कपडे तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
‘सहयोग सेतू’ या संस्थेने सर्व एक हजार कुटुंबांना देण्यासाठी दिलेले बेसन लाडूही घरोघरी वाटण्यात आले. जवळपास ५०० युवक युवतींना कुर्मा व मासिक पाळीविषयी प्रश्न विचारून सर्वेक्षण ही करण्यात आले. त्यानुसार,असे लक्षात आले की कुर्माप्रथा बंद व्हावी,असे सर्वांनाच वाटते.पण गावाच्या भीतीने पुढाकार घ्यायला कोणी तयार होत नाही.म्हणून अशा परिवर्तनशील युवकांचे ‘युवा आरोग्य मंडळ’ स्थापन करून गावातील प्रश्नांवर त्यांच्यामार्फत एकजुटीने यापुढे कामं केले जाणार आहे.
शेवटच्या दिवशी गावातील समाजबंधने नेमलेली आरोग्यसखी व इतर सक्रिय महिलांनी गावातील महिलांना कुर्माघरात ठेवावं की घरात? यावर चर्चा करण्यासाठी महिला सभा भरवली होती. काही गावात सुमारे १०० च्या आसपास स्त्री-पुरुष या सभांना उपस्थित होते, हे चित्र फारच आश्वासक आहे. सभेस उपस्थित सर्वांसमोर पाळीच्या काळात कुर्माघरात न राहता घरी राहण्याबद्दल विचारणा केली. यावेळी काही गावातील पारंपरिक नेतृत्व/प्रतिष्ठित पुरुषांनी महिलांनी कुर्मा घरात रहावं कि घरात की अंगणात हे त्यांचं त्यांनी ठरवलं तरी आमची हरकत नसेल. आम्ही त्यासाठी कुणाकडूनही दंड घेणार नाही, असे भर सभेत घोषित केले.
कुर्मा निर्मूलनाच्या प्रवासातील हे फार क्रांतिकारक पाऊल आहे. १४ गावातील जवळपास ४०० महिलांनी मी कुर्माघरात राहणार नाही, अशी शपथ भरसभेत घेतली. तसेच स्वयं घोषणापत्रावर अंगठा/सही देखील केली. १०० हून अधिक पुरुषांनीदेखील त्याला अनुमोदन देत त्यावर सह्या केल्या.
“केल्याने होत आहे रे,आधी केलेची पाहिजे. शासन, सामाजिक संस्था हे लोकांच्या भावना दुखवायला नको, कुर्मा हा आदिवासी संस्कृतीचा भाग आहे, असं समजत लोकांचा रोष नको म्हणून कुर्मा प्रथा बदलणार नाही म्हणत त्यापासून अंतर राखून आहेत. काही संस्था आणि शासन त्यावर पर्याय म्हणून सिमेंटची कुर्माघरे बांधून देत आहेत. पण आपण प्रबोधन करत राहिलो तर सुरुवातीला विरोध होतो. त्यानंतर बदलही होतो. हेच समाजबंधच्या सत्याच्या प्रयोगातून सिद्ध होतंय. त्यामुळे विरोधाला फार न घाबरता अनिष्ठ प्रथेला संस्कृती समजून गोंजारत बसण्यापेक्षा त्यावर ठाम भूमिका घेत महिलांचं आरोग्य, सुरक्षा आणि आत्मसन्मान जपायला हवं. यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे.” अशी प्रतिक्रिया समाजबंधचे शिबीर संयोजक वैभव शोभा महादेव म्हणाले.
आतापर्यंत समाजबंधने काम केलेल्या १९ पैकी १० गावातील महिला,युवावर्ग आणि काही पुरुषही कुर्माप्रथेला मूठमाती देण्याच्या दिशेने वेगाने पाऊले टाकत आहेत. तर शेकडो महिला व मुली पाळीच्या काळात कुर्माघरात न राहता गुपचूप घरात राहत आहेत. याचाच अर्थ या प्रथेतील फोलपणा लोकांच्या ही हळूहळू लक्षात येत आहे. सातत्याने या विषयात काम करत राहिलं, तर येत्या १० वर्षात भामरागडमधील परिस्थिती बदलेल, याचा आम्हाला विश्वास आहे.” असं समाजबंधच्या प्रशिक्षक शर्वरी सुरेखा अरुण म्हणाल्या.