राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. कोकोडे यांचा सत्कार.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे १८ वे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन आदर्श गाव घाटकुळ (ता.पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे आयोजित करण्यात आले आहे. सदर दोन दिवसीय संमेलन दि. १२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी होत असून सदर संमेलनाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, सर्व स्थानिक मंडळ आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. राष्ट्रसंत साहित्य दिंडी,उद्घाटन समारंभ, विशिष्ट सेवा पुरस्कार वितरण, परिसंवाद, सप्तखंजेरी युवा कीर्तनकार इंजि.उदयपाल महाराज वणीकर यांचे राष्ट्रीय कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यानपाठ, निसर्गोपचार व योग प्राणायाम मार्गदर्शन, अनुभव कथन, कवी संमेलन आणि समारोप असे संमेलनाचे एकंदरीत स्वरूप असणार आहे.१८ व्या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. नामदेव कोकोडे (ब्रम्हपुरी) यांचा सत्कार त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला. शिक्षक भारतीचे नागपूर विभागीय अध्यक्ष ग्रंथमित्र भाऊराव पत्रे (कोंढाळा) आणि तुळशी येथील मुख्याध्यापक विष्णू दुनेदार ,जीवन गणभोज यांनी डॉ. कोकोडे यांचा शाल ,श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला .याप्रसंगी डॉ. कोकोडे यांच्या सौभाग्यवती उपस्थित होत्या . याप्रसंगी संमेलनाच्या एकंदरीत स्वरूपावर चर्चा करण्यात आली.तसेच आयोजनाबाबत उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉ.नामदेव कोकोडे हे एन.एच.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असून त्यांनी आजवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनुरूप केलेले शैक्षणिक, विद्यापीठ स्तरावरील केलेले कार्य उल्लेखनीय आहे. कर्मयोगी संत गीताचार्य श्री.तुकाराम दादा यांनी सुरू केलेल्या भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या सेवाकार्यात त्यांनी योगदान दिलेले आहे. युवा वर्गांना शैक्षणिक मार्गदर्शन,संशोधनपर लेखन आणि जनप्रबोधन या माध्यमातून ते श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यास जुळलेले आहेत.