गडचिरोलीत १० लाखांच्या इनामी तीन नक्षलींना अटक, एका महिलेचा समावेश.

अटक करण्यात आलेली नक्षली

गडचिरोलीत १० लाखांच्या इनामी तीन नक्षलींना अटक, एका महिलेचा समावेश.


एस.के.24 तास


गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलातून २ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा (जांबिया) पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील झारेवाडा जंगलात एका नक्षलवाद्याला अटक करण्यात आली. लाहेरीजवळील कारवाई जिल्हा पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाने (सी-६०) आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बटालियन ३७ च्या जवानांनी संयुक्तपणे केली. या तिघांवर एकूण १० लाख रुपयांचे ईनाम होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि.२८ रोजी भामरागड उपविभागांतर्गत येणा­ऱ्या लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोयार जंगल परीसरात विशेष अभियान पथक आणि व सीआरपीएफचे जवान संयुक्तपणे नक्षल विरोधी अभियान राबवित होते. यावेळी रमेश पल्लो (२९ वर्ष) रा.कोयार ता.भामरागड आणि तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी (२३ वर्ष, रा.पद्दुर ता.भामरागड) यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. याशिवाय झारेवाडा जंगल परिसरातून अर्जुन ऊर्फ महेश रैनू नरोटे (२७ वर्ष) रा.झारेवाडा ता.एटापल्ली याला पकडण्यात आले.


तिघांचाही अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग : - 


रमेश पल्लो हा कंपनी १० चा ॲक्शन टिम मेंबर आणि सध्या स्कॉऊट टिम मेंबर म्हणून कार्यरत होता. त्याचा ३ खून, ८ चकमकी, एक जाळपोळ व एक इतर अशा एकुण १३ गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. त्याच्या राज्य शासनाने ४ लाख रुपयांची बक्षीस ठेवले होते.


तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी ही महिला नक्षली सन २०१६ ते २०१९ पर्यंत प्लाटून क्रमांक ७ मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. २०१९ ते आतापर्यंत ती कंपनी क्र.१० मध्ये सदस्यपदावर कार्यरत होती. तिचा ४ खून, ३ चकमकी अशा एकूण ७ गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे. तानीवर ४ लाखांचे बक्षीस होते.


अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे हा २०१० ते २०१३ पर्यंत पेरमिली दलम सदस्य पदावर कार्यरत होता. त्यानंतर प्लॉटून क्र. १४ मध्ये, त्यानंतर सिरोंचा दलममध्ये बदली होऊन २०१८ पर्यंत तिथे कार्यरत होता. मे २०१८ पासून ते आजपर्यत तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याच्यावर ७ खून, ९ चकमकी, २ जाळपोळ, २ दरोडे आणि एक जबरी चोरी व इतर ३ अशा एकूण २४ गुन्ह्यांचा आरोप आहे. त्याच्यावर २ लाखांचे बक्षीस होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !