सोमनाथ येथे श्रमसंस्कार छावणीचे आयोजन ; डॉ.विकास आमटे यांचे सहभागी होण्याचे आवाहन.
एस.के.24 तास
चंद्रपूर : श्रद्धेय स्वर्गीय बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ प्रकल्पावर दिनांक 15 ते 22 मे 2022 या कालावधीत आंतरभारती - भारत जोडो - श्रमसंस्कार छावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमसंस्कार शिबिरात (छावणीत) राज्यातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी 9561663111 वा 9673574148 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महारोगी सेवा समिती, आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुका ठिकाणापासून सुमारे 13 किमी अंतरावरील घनदाट जंगल असलेल्या निसर्गरम्य सोमनाथ या ठिकाणी स्वर्गीय बाबा आमटे यांनी ही श्रमसंस्काराची चळवळ 1968 पासून सुरु केली आहे. तेव्हापासून ती कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षे अपवाद वगळता अविरतपणे सुरू आहे. आजवर या श्रमसंस्कार छावणीतून सामान्य माणसांपासून ते दिग्गजांपर्यंत लाखो लोकांनी हजेरी लावली आहे. या छावणीतून राज्यातीलच नव्हे तर अगदी आंतरराज्यीय पातळीवरचे अनेकजण आपला सहभाग नोंदवित असतात.श्रमाला प्रतिष्ठा देणे तथा श्रमसंस्कार सोबतच सामाजिक बांधिलकीसह मानवी मूल्ये जपणारे संस्कार देणे हे महत्त्वपूर्ण कार्य या छावणीच्या माध्यमातून केल्या जाते. कोरोना प्रादुर्भावानंतर या वर्षी सोमनाथ येथे या श्रमसंस्कार छावणीचे आयोजन करण्यात आले आहे. या छावणीत सहभागी होणाऱ्या इच्छुकांनी डॉ.विकास आमटे, संयोजक, आंतर भारती - भारत जोडो - श्रमसंस्कार छावणी, सोमनाथ,आनंदवन, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर (442914) या पत्त्यावर वा वरील भ्रमणध्वनीवर किंवा somnathcamp@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.