कवी / लेखक : - खेमदेव कन्नमवार चंद्रपूर यांच्या लेखणीतून...
झाडी बोली साहित्य संमेलन ; एक अभूतपूर्व सोहळा.
एस.के.24 तास
मी आज पर्यंत पंढरीची वारी केली नाही.पण मराठी माणसाने एकदा तरी वारी करावी असे म्हणतात म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी करावी अशी इच्छा होती.परंतू जुनासूर्ला येथील साहित्य संमेलनची वारी केली आणि बस झाल! पंढरीची वारी झाली असे वाटले.
विचार केला पंढरीच्या वारीत या पेक्षा काय निराळे असेल ?
" पंढरीची वारी करी वारकरी,
उन पावसाची चिंता कोण करी."
हीच भावना याही साहित्य संमेलनात पाहायला मिळाली.
शिस्त,स्वावलंबन,स्वयंपूर्णता आणि समर्पण या नीतिमुल्यांसाठी पंढरीची वारी प्रसिद्ध आहे.ही सर्व नीतिमूल्ये या साहित्य संमेलनात प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली.जिथे शिक्षित समाजाला साहित्य संमेलन म्हणजे काय ? या प्रश्नाचे समर्पक उत्तर देता येत नाही.तिथे साहित्य संमेलनासारखा शब्द कधीही न ऐकलेल्या अशिक्षित, अल्पशिक्षित शेतकरी, कष्टकरी,शेतमजूर,मेंढपाळ यांना एकत्र आणून त्यांना साहित्य संमेलनाचा एक भाग बनविणे नक्कीच सोपे नव्हतेच.
महाराष्ट्रात त्यातल्या त्यात विदर्भात सण उत्सव म्हटले की एक वेगळीच रंगत असते.सर्व समाज एकत्र येऊन तन मन धनाने सहकार्य करून उत्सव साजरा करतो याची प्रचिती वेळोवेळी येत असते.जुनासुर्ला वासियांनी हे संमेलन वैचारिक पातळीवर न घेता श्रध्देच्या पातळीवर घेतले आणि जिथे श्रद्धा असते तिथे कोणत्याच किंतू परंतूला वाव नसते.असते फक्त भावनेचा ओलावा,प्रेम, आदर आणि आनंददाची अनुभुती.
" आधुनिक काळात प्रत्येक गोष्ट नफा तोट्याच्या तराजूत तोलून केली जाते " हा समज जुनासुर्ला वासीयानी स्पेशल खोटा ठरविला. संमेलन आपल्याला काय देऊन जाणार ? याचा यत्किंचितही विचार न करता,मनात कोणतीही शंका कुशंका न ठेवता फक्त संमेलन यशस्वी झाले पाहिजे या एकाच ध्यासासाठी झटत होते.बाहेर गावावरून आलेला प्रत्येक व्यक्ती हा आमच्या घरचा पाहुणा आहे आणि त्याची काळजी घेणे,त्याला सुविधा पुरविणे आपले कर्तव्य आहे ही एकच भावना संपूर्ण गावाला एका सूत्रात घट्ट बांधून ठेवत होती.
गावातील प्रत्येक गल्लीत, मुख्य रस्त्यावर, चौरस्त्यावत पाणी शिंपडून टाकलेली रांगोळी, आपापल्या संस्कृती,परंपरा,चालीरीती प्रमाणे केलेली वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती करीत होती. गावकऱ्यांना दिंडीचा कोणताही पूर्वानुभव नसताना ग्रंथ दिंडी सोहळा अविस्मरणीय,अद्वितीय,अद्भुत,अतुल्य करून दाखविले.काय म्हणावे या ऊर्जेला ?कुठून आली असेल ही अदृश्य शक्ती ?
१२ व १३ मार्च २०२२ दोन दिवसीय संमेलन असल्यामुळे दोन्ही दिवसांचा प्रत्येक क्षण सत्कर्मी लागावा म्हणून धडपडणारे आयोजक हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.परंतु त्याहीपेक्षा साहित्य क्षेत्राशी काहीं एक संबंध नसताना अचानक आलेल्या संधीचे आत्मीयतेने, जबाबदारीने स्वागत करणाऱ्या गावकऱ्यांचे अभिनंदन शब्दात होणे शक्य नाही.
साहित्य संमेलनातून मला काय मिळाले ?
प्रत्यक्ष विठ्ठलाने तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुमची विचारपूस केली,तुमच्याशी संवाद साधला तो क्षण तुमच्यासाठी कसा असेल.माझ्यासाठी तर तो अभूतपूर्व क्षण होता.परमोच्च आनंदाचा क्षण होता.
प्रसंग...
कार्यक्रम पत्रिकेत कविता सादर करणाऱ्यांमध्ये माझे नाव नव्हते म्हणून मला कविता सादर करण्याची संधी शेवट शेवटचं मिळाली तो पर्यंत अनेक मातब्बर मंडळी कविता सादर करून गेलेे होते. नियोजित कार्यक्रमाची वेळ संपली होती, आयोजक पुढील कार्यक्रमाची योजना आखत होते. त्यामुळे माझे कविता सादरीकरण म्हणजे फक्त औपचारिकता होती असे म्हणता येईल. म्हणून मी सुद्धा थोड घाईतच आटोपते घेतले.
त्याही परिस्थितीत घडले ते उलट व सुखद धक्का देणारे मी कविता सादर केली व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आचार्य थुटे सरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारून जाणार तेव्हाच आपल्या झाडी बोलीचे विठ्ठल गुरुवर्य आदरणीय श्री हरिश्चंद्र बोरकर सर व संमेलनाध्यक्ष मा.डॉ.मनोहर नरांजे सरांनी माझ्या कवितेची नोंद घेवून.मला जवळ बोलावून माझी वैयक्तिक विचारणा केली.
खांद्यावर हात ठेवला काही ऐकून घेतले.आपसात हितगुज झाला.थोडक्यात काही मार्गदर्शन केले.मा. नरांजे सरांनी स्वतःआपला मोबाईल क्रमांक दिला नंतर संपर्क साधायला सांगितले.या पेक्षा एका सामान्य कवीला पुन्हा काय पाहिजे.हो राहीलच मी सरांसोबत एक सेल्फी पण घेतली.मी तर धन्य झालो.
संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यामुळे संमेलन शत प्रतिषत यशस्वी झाले.आनंद व उत्साहाच्या भरात काही किरकोळ त्रुटी राहिल्या त्या झाकल्या पण गेल्या परंतू " A near miss today could be an accident tomorrow" म्हणून पुढील संमेलनाचा विचार करता प्रत्येक near misses चा,त्रुटींचा भविष्याच्या दृष्टीने सारासार विचार व्हावा असे वाटते.
धन्यवाद..!
कवी / लेखक : - खेमदेव कन्नमवार,चंद्रपूर