वीस रुपयाच्या टरबूजा साठी घरात घुसून महिलेचा विनयभंग व मुलांना जबर मारहाण.
एस.के.24 तास
राजुरा : येथील समीर रहीम शेख हे आपला भाऊ, दोन बहिणी वडील व आई यांच्यासह सोनिया नगर येथे राहतात. त्यांचा भाऊ तनवीर शेख व त्यांचे वडील हे राजुरा ते रामपूर मार्गावर असलेल्या वळणावर फेरी विक्रेता म्हणून फळांची विक्री करतात व समीर रहीम शेख हे राजुरा मध्येच एका मोबाईल च्या दुकानांमध्ये काम करतात दिनांक ०१/०३/२०२२ रोजी त्यांचे भाऊ व वडील हे दुकानावर असताना काही अनोळखी इसम आले व त्यांनी तेथून वीस रुपयाचे टरबूज विकत घेतले. त्यांच्या वडिलांनी त्याचे पैसे मागितले असता मुझे पहचानता नही क्या ? मैं पापा का साला हूं मुझसे पैसे लेंगा क्या ? असे म्हणत यांच्या वडिलांना धक्काबुक्की केली असता. त्यांचा भाऊ तन्वीर शेख हा मध्ये पडला व सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु यांनी काही लोकांना आपल्या मदतीला अजून बोलाविले व हे सर्व गुंड मिळून त्यांचे वडील व भावाला मारहाण करू लागले .आपल्या बाचावा खातर त्यानी देखील त्या सर्व दहा ते पंधरा गुंडांचा प्रतिकार केला. या झटापटी मध्ये त्या गुंडांना देखील मार लागला. त्यावेळी ते तेथून निघून गेले. परंतु त्यानंतर त्या ठिकाणी विनोद जाधव उर्फ पापा काही लोकांसह दाखल झाला व तन्वीर शेख यांना पाहून घेण्याची धमकी दिली. व ही धमकी त्याने त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांसमक्ष दिली जे त्यावेळी त्या ठिकाणी झालेल्या राड्याची माहिती मिळाल्यानंतर आले होते हे विशेष.
विनोद जाधव उर्फ पापा याने सकाळी तन्वीर शेख यांना दिलेल्या धमकी प्रमाणे रात्री अंदाज अकरा वाजता तन्वीर शेख ,समीर शेख यांच्या राहत्या घरी जाऊन गोंधळ घातला लाठ्याकाठ्या घेऊन त्यांच्या घरावर चालून आले. परिवार मध्ये बचावासाठी आला असता. तेथे त्यांच्या दोन्ही बहिणींना मारहाण केली, आईला देखील मारहाण केली संपूर्ण परिवाराला विनोद जाधव उर्फ पापा याच्यासह आलेले लल्ली शेरगिल,रोशन, व सरदार नावाचा गुंड व इतर पाच ते सात गुंड प्रवृत्तीचे लोक यांनी बेदम मारहाण केली तसेच समीर शेख यांचे डोके फोडले एवढ्यावरच ते थांबले नाही तर या सर्वांनी मिळून संपूर्ण घराची नासधूस केली.घरच्या दाराचा अक्षरशःचुराडा केला.घरातील भांडे, टीव्ही, इत्यादी वस्तूंची तोडफोड केली व पोलीस कम्प्लेंट दिली तर तुम्हा सर्वांचा जीव घेउ अशा धमक्या देत हे सर्व गुंड त्यांच्या हातामध्ये असलेली काही हत्यारे व लाकडी दंडुके हवेमध्ये फिरवत निघून गेले.
हा प्रकार अत्यंत भयावह व सभ्यसमाजा मध्ये दहशत पसरविणारा असून यावर अद्याप पोलीस प्रशासनाने फक्त गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये देखील लावलेली कलमे ही घडलेल्या प्रकारानुसार लावलेली नाहीत असा आरोप पीडितांनी व युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी केला आहे. विशेष महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी देखील या गाव गुंडांवर तडीपारीची कार्यवाही करण्या संदर्भात सुरज ठाकरे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नागपूर यांना तक्रार अर्ज दिलेला आहे.त्यावर देखील अजून पर्यंत पोलीस प्रशासनाने कुठलीच कार्यवाही केलेली नाही आणि त्यामुळेच या गावगुंडांची हिम्मत वाढलेली आहे व वृत्त लिहेस्तोवर कुठल्याही आरोपीला पकडण्या मध्ये राजुरा पोलिसांना यश आलेले नाही.
कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याची चर्चा राजुरा मध्ये सर्वत्र या प्रकरणामुळे रंगलेली आहे.
आरोपी हे खुलेआम फिरत असून फोनवर वारंवार फिर्यादी ना धमकावत आहेत. फिर्यादीशी संबंधित लोकांना देखील धमकावत आहेत असे असून देखील अजून पर्यंत पोलीस प्रशासनाने आरोपींवर कुठलीही कार्यवाही केली नसल्याने पोलीस प्रशासनाचा वचक व कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही अशी परिस्थिती एकंदर पहावयास मिळत आहे.अठ्ठेचाळीस तासाच्या आत मध्ये सदर आरोपींना तडीपार न केल्यास सदर पीडित परिवाराने आमरण उपोषणास बसण्याची चेतावणी पोलीस प्रशासनाला दिलेली आहे.
सदर प्रकरण हे सुरज ठाकरे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे उघडकीस येऊन कार्यवाही पर्यंत मार्गी लागण्याची शक्यता आहे अन्यथा हे प्रकरण दाबून टाकण्यात आले होते.