वाघाच्या हल्यात महीला ठार.
एस.के.24 तास
मुल - तालुक्यातील कोसंबी येथील शेतकरी महिला ज्ञानेश्वरी वासुदेव मोहूर्ले (५५) ही स्वतःच्या शेतात लाखोळी खोदत असतांना शेतालगतच्या झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने तीचेवर हल्ला करुन ५० मीटर अंतरावर ओढत नेऊन ठार केल्याची घटना आज १८/२/२०२२ रोजी दुपारी ४ वाजताचे सुमारास घडली. मृतक शेतकरी महिलेचे शेत गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. नेहमी प्रमाणे मृतक स्वतःच्या शेतात लाखोळी खोदत असतांना वाघाने हल्ला करुन तीला ठार केले. याबाबतची माहिती ग्रामस्थांना होताच सरपंच रवींद्र कामडी, पोलीस पाटील अर्चना मोहूर्ले, सारिका गेडाम व काही ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहीती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली. माहीती होताच ठाणेदार सतिशसिंह राजपूत आणि वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे, क्षेत्र सहाय्यक प्रशांत खनके,वनरक्षक राकेश गुरनुले, मरसकोल्हे यांनी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांनी मृतक महीलेच्या परीवारास ३० हजार रूपयाची तातडीची मदत दिली.