शवविच्छेदन गृह असताना इतरत्र उत्तरीय परीक्षण.
★ पालांदुर/चौ येथील प्रकार.
★ अकारण आर्थिक भुर्दंड व त्रास करावा लागतो सहन.
एस.के.24 तास
भंडारा : लाखनी तालुक्यातील पालांदुर/चौ. येथे अद्यावत ग्रामीण रुग्णालय , वैद्यकिय अधिकारी तथा सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना अपघाती मृत्यू झाल्यास उत्तरीय परिक्षणाकरिता लाखनी अथवा उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नातेवाईकांना मृतदेह न्यावा लागतो. त्यामुळे गरिबांना अकारण आर्थिक भुर्दंडासह त्रास सहन करावा लागतो. ही बाब लोक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांना माहीत असूनही कसलेही प्रयत्न केले गेले नाही. मृतदेहाचे उत्तरीय परीक्षण पालांदुर येथेच करण्यात यावे.अशी परिसरातील जनतेकडून मागणी होत आहे.
पालांदुर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्रात लाखनी व लाखांदूर तालुक्यातील ५९ गावे समाविष्ट आहेत. या गावातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाल्यास जसे वीज पडून,पाण्यात बुडून,झाडावरून पडून,आगीत जळून,गळफास घेऊन , विष प्राशन करून अथवा इतर कारणांमुळे मृत्यू पावल्यास पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृत्यू नेमका कसा झाला याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उत्तरीय परीक्षण करावे लागते. पालांदूर येथे ग्रामीण रुग्णालय शवपरीक्षण गृह तथा सर्व सोयी उपलब्ध असताना मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखनी किंवा उपजिल्हा रुग्णालय साकोली अथवा काही अपवादात्मक परिस्थितीत किंवा मृतकाचे नातेवाईकांचा आक्षेप असल्यास शव परिक्षणासाठी मृतदेह सामान्य रुग्णालय भंडारा येथे न्यावा लागतो. त्यामुळे गरीब कुटुंबांना अकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागून कर्जबाजारी होण्याची नामुष्की ओढवते. या प्रकाराने वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. पालांदूर(चौ) येथे अंदाजे २० वर्षापूर्वी शव विच्छेदन गृह तयार करण्यात आले असले तरी या ठिकाणी अद्याप एकाही मृतदेहाचे शव परीक्षण करण्यात आले नसल्यामुळे ही वास्तू कशासाठी ? तसेच या इमारतीकरिता अनावश्यक शासकीय निधी का खर्च केला गेला? हे एक न उलगडलेले कोडेच आहे. ही बाब लोक प्रतिनिधी , सामाजिक कार्यकर्त्यांना माहीत असली तरी शव विच्छेदनगृह सुरू करण्याबाबद कसलेही प्रयत्न केले गेले नाही.त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे.पालांदूर परिसरातील गरीब जनतेचा विचार करून शव विच्छेदनगृह सुरू करावे.अशी मागणी होत आहे.