एस.के.२४ तास
भंडारा : भंडारा येथे जुन्या वादातून एका १९ वर्षीय युवकावर धारदार चाकूने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी सोमवारला तिघांना तर मंगळवारला अन्य एकाला नागपूर येथून अटक केली. या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता चार झाली आहे.महेंदू राजेश पाटील (१९) असे मृतकाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी उमेश मारोती सोनकुसरे (२१) याला घटनेच्या दिवशी रात्रीच ताब्यात घेतले होते. दरम्यान, उमेश च्या माहितीवरून भंडारा पोलिसांनी घटनेनंतर फरार झालेल्या अन्य दोघांना सोमवारी नागपूर येथून अटक केली. त्यात रज्जू उर्फ रामकृष्ण माणिक शेंद्रे (४०), चिंटू उर्फ रजत दीनदयाल सोनेकर (२४) दोघेही रा. इंदिरा गांधी वार्ड,कुंभार डोली भंडारा यांचा समावेश होता.तिघांचीही कसून चौकशी केली असता या प्रकरणी अमित उर्फ ढेकल्या महाकाळकर (२५) रा. इंदिरा गांधी वार्ड, कुंभार डोली भंडारा याचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी अमितचा मागोवा घेतला असता, तो नागपुरात दडून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून मोठ्या शिताफीने पोलिसांनी अमितला नागपूर येथून अटक केली. आज भंडारा पोलिसांनी चौघानाही जिल्हा न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.