महाराष्ट्र हत्तीरोग निर्मूलनासाठी मिशन मोडवर काम करावे : आरोग्यमंत्री राजेश टोपे ■ सहा जिल्ह्यात १ कोटींहून अधिक नागरिकांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करणार.

 महाराष्ट्र हत्तीरोग निर्मूलनासाठी मिशन मोडवर काम करावे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

■ सहा जिल्ह्यात १ कोटींहून अधिक नागरिकांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करणार.



एस.के.24 तास


भंडारा : (मुकेश मेश्राम)राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम पंधरवडा 15 जुलै पर्यंत चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा,गोंदिया,नांदेड आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून त्याचा शुभारंभ काल राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला. महाराष्ट्रातून हत्तीरोग निर्मूलनासाठी यंत्रणांनी मिशन मोडवर काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेचा ऑनलाईन शुभारंभ प्रसंगी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. अर्चना पवार यांच्यासह भंडारा येथून जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आदिती त्याडी उपस्थित होते. राज्यातील 18 जिल्हे हत्तीरोग प्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. त्यापैकी जळगाव, सिंधुदुर्ग, लातूर, अकोला, नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, अमरावती, ठाणे, पालघर, नागपूर आणि वर्धा या बारा जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये आता ही मोहिम बंद करण्यात आली आहे. सध्या उर्वरित सहा जिल्ह्यांमध्ये ही मोहीम आजपासून 15 जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड व यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये 8098 गावांमधील 1 कोटी 3 लाख लोकांना हत्तीरोग विरोधी गोळ्या सेवन करण्यासाठीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. या सहाही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी समन्वय समितीच्या सभा घेतल्या असून नागरीकांना गोळ्या वाटपासाठी 41 हजार 352 कर्मचारी व 4135 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन मिशन मोडवर ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी आरोग्य मंत्र्यांनी डॉक्टर दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !