उन्हाळी धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ,अखेर ग्राम आंदोलन समितीला यश.
◆ मा खासदार सुनील मेंढे यांच्या केंद्रीय मंत्री पियुष गोयल भेटीनंतर उचलल्यागेले पाऊल.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम) धान खरेदी केंद्र सुरु करण्यास आधी सरकारकडून विलंब झाला आणि सुरु झाल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जिल्ह्यातील अनेक केंद्र सुरु सुद्धा झाले मात्र राज्य शासन आणि जिल्हा पणन विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि बारदाण्याच्या अभावामुळे केंद्र बंद पडण्याची नामुष्की झाली. अनेक शेतकरी हवालदिल होऊन संभ्रमात होते त्यामुळे सातत्याने ग्राम आंदोलन समितीने विविध आंदोलने करून सदर बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा सुनील मेंढे यांनी या संदर्भात केंद्रीय मंत्री मा पियुष गोयल यांना प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी कथन केले आणि त्यानंतर केंद्रीय सचिव जय प्रकाश यांनी दिनांक १ जुलै २०२१ ला महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून उन्हाळी धान केंद्राची मुदतवाढ करण्यासंदर्भात निर्देश दिले त्यामुळे उन्हाळी धन खरेदी करण्याची मुदतवाढ ३१ जुलै २०२१ पर्यंत झाली आणि सदर प्रकरण मार्गी लागले. यामुळे केवळ भंडारा गोंदियाच नव्हे तर पूर्व विदर्भातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे मत ग्राम आंदोलन समितीचे संयोजक महेंद्र निंबार्ते यांनी व्यक्त केले.
आता धान केंद्रावरील काही समस्या लवकरच मार्गी लावण्यात येतील असेही महेंद्र निंबार्ते म्हणाले. 'आधारभूत' धान खरेदी केंद्र शब्दातून शेतकऱ्यांचा 'आधार' जाऊन केवळ 'भूत' उरू नये याची प्रशासनाने दखल घ्यावी. सदर प्रकरण मार्गी लावल्यामुळे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, माजी आमदार चरण वाघमारे, तसेच माजी आमदार बाळा काशिवार यांचे अभिनंदन ग्राम आंदोलन समितीचे संयोजक महेंद्र निंबार्ते, मंगेश वंजारी, संजय भोले, प्रफुल्ल संरित, सत्यवान पेशने, महेश गिऱ्हेपुंजे, दीपक वंजारी, सुरेश बांते, लोकेश मोटघरे, पतिराम गिऱ्हेपुंजे, कवळु गिऱ्हेपुंजे, देवा बोदेले, आकाश वंजारी, पंढरी गिऱ्हेपुंजे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केले.