ग्राम आंदोलन समितीच्या आक्रमक पवित्र्यानंतर धारगाव धान खरेदी केंद्र २५ जून पासून पूर्ववत सुरु होणार.
◆ सात हजार बारदाण्याची व्यवस्था करण्यात आली.
◆ केंद्रावर हमाली देण्याची आवश्यकता नाही,सरकार बोऱ्यामागे अकरा रुपये केंद्राला देते.
एस.के.24 तास
भंडारा : ( मुकेश मेश्राम ) जिल्ह्यातील धारगाव येथे
ग्राम आंदोलन समितीच्या आक्रमक पवित्र्यानंतर राजेगाव (धारगाव) धान खरेदी केंद्र २५ जून २०२१ पासून पूर्ववत सुरु होणार असल्याची घोषणा जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांनी केली. एकूण धारगाव धान खरेदी केंद्राला सात हजार बारदाण्याची व्यवस्था युद्धपातळीवर करून देण्यात आली. जिल्ह्याला आज चार ट्रक बारदाना कोलकातावरून येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसापासून सदर विषयाला घेऊन धारगाव येथील शेतकऱ्यांनी ग्राम आंदोलन समितीच्या वतीने विविध आंदोलने केली. तत्पूर्वी धारगाव परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी ग्राम आंदोलन समितीमार्फत राजेगाव (धारगाव) येथील केंद्रावर हल्लाबोल केला. परिसरातील बारा गावांचे शेतकरी धारगाव धान खरेदी केंद्रासोबत जोडले आहेत. बारदाना संपला म्हणून खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांना परत पाठवले जात होते.त्यामुळे बारदाण्याची व्यवस्था करण्यात यावी. नोंदणी क्रमांकानुसार शेतकऱ्यांचे धान घेत नाहीत. प्रत्येक बोऱ्यांमागे पंधरा हमाली घेण्यात येत होती. ओलावा आहे म्हणून अधिकचे किती धान शेतकऱ्यांकडून घेतले जावेत याचेही निर्धारण करावे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात येत नाहीत तोपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावे. अशाप्रकारच्या शेतकऱ्यांनी मागण्या मांडल्या होत्या. सदर मागण्या सोडविल्या नाहीत तर येत्या गुरुवारला जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांच्या कार्यालयाला कुलूप ठोको आंदोलन करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता त्या अनुषंगाने भंडारा जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग यांनी ग्राम आंदोलन समितीला जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांच्या कक्षात चर्चेला बोलाविले होते आणि या चर्चेचे फलित म्हणजे धारगाव धान खरेदी केंद्र पुन्हा पूर्ववत सुरु होणार असल्याची घोषणा झाली तसेच प्रत्येक बोऱ्यामागे हमाली देण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले कारण सरकार धान खरेदी केंद्राला बोऱ्यामागे अकरा रुपये देत असते. जर केंद्रप्रमुख हमाली घेत असेल तर त्यांची पोलिसात, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी असे स्पष्ट जिल्हा पणन अधिकारी खर्चे यांनी सांगितले. धानाला कुठलाही ओलावा नसेल तर शेतकऱ्यांनी अतिरिक्त धान येऊ नये. यावेळी प्रामुख्याने ग्राम आंदोलन समितीचे महेंद्र निंबार्ते, मंगेश वंजारी, महेश गिऱ्हेपुंजे, दीपक वंजारी, नीलकंठ कायतें, शंकर लोले, सुरेश बांते, लोकेश मोटघरे, पतिराम गिऱ्हेपुंजे, कवळु गिऱ्हेपुंजे, देवा बोदेले, आकाश वंजारी, पंढरी गिऱ्हेपुंजे, विलास वरकडे, भूषण मरघडे, पोलीस विभागातर्फे राम दीक्षित, महेश रघुवंशी, नरेंद्र झलके, इतर पोलीस आणि होमगार्ड कुमक तथा शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.