जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना बोनस द्यावा- बाजार समिती संचालकांची मागणी.
एस.के.24 तास
मुल : ( नितेश मँकलवार ) शासकिय खरेदी केंद्रावर धान विक्री केलेल्या शेतक-यांना बोनसची रक्कम देण्यांत यावी. अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे कडे केली आहे. सन २०२०-२१ मधील खरीप हंगामात शासकिय धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतक-यांना ५० क्विंटल पर्यंत प्रति क्विंटल ७०० रूपये प्रमाणे बोनस रूपाने देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामूळे बहुतांश शेतक-यांनी आपला उत्पादीत शेतमाल शासकिय धान खरेदी केंद्रवर विक्री केला आहे.
परंतू जाहीर केलेल्या निर्णया नुसार आजपर्यंत एकाही शेतक-यांना बोनसची रक्कम मिळालेली नाही. त्यामूळे शेतक-यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून चालु हंगामात बि बियाणे, खते आणि मजुरांची मजुरी दयायची कशी, असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाला आहे. संकटात सापडलेल्या शेतक-यांना सहकार्याचा हात देण्यासाठी शासनाने बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला परंतू अजून पर्यंत एकाही शेतक-यांना बोनसची रक्कम मिळाली नाही, त्यामूळे शेतक-यांमध्यें काहीशी नाराजी दिसून येत आहे. करीता चालु हंगामात शेतक-यांना शेतीच्या मशागती शिवाय पिक कर्जाची रक्कम भरणे सोईचे व्हावे म्हणून शासनाने जाहीर केलेल्या बोनसची रक्कम दयावी.
अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती,घनश्याम येनुरकर यांचे नेतृत्वात बाजार समितीचे उपसभापती संदीप कारमवार,संचालक राकेश रत्नावार,अखील गांगरेड्डीवार,राजेंद्र कन्नमवार,शांताराम कामडी,डाॅ.पद्माकर लेनगुरे,किशोर घडसे यांनी केली आहे.