लाखनी तालुक्यातील तंटामुक्त गाव समित्यांचे कार्य कागदावरच.


 लाखनी तालुक्यातील तंटामुक्त गाव समित्यांचे कार्य कागदावरच.


एस.के.24 तास


भंडारा : ( मुकेश मेश्राम ) क्षुल्लक कारणांवरून होणारे तंटे गावांतच मिटावे आणि गावांना शांततेकडून समृद्धीकडे नेता यावे,हा उद्देश ठेवून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. याकरिता गावनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या. परंतु परिसरातील अनेक गावांत या समित्या केवळ कागदापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत.या समित्यांचे कार्य शून्य असल्याचे दिसून येते.शासन तंटामुक्त गावांना लाखो रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसे देते.मात्र काही गावांचा अपवाद वगळता बहुतांश गावांमधील तंटामुक्त समित्या कागदावर आहेत.गावांमधील तंटे गावांमध्येच सामोपचाराने मिटवून गावांना शांततेकडून समृद्धीकडे नेण्यासाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली.मात्र प्रशासकीय कामकाजातील उणिवा या योजनेत अडसर ठरत आहेत.या उणिवा दूर केल्यास या योजनेची संकल्पना खऱ्या अर्थान यशस्वी ठरण्याची शक्यता आहे.

ही मोहीम राबविताना सहज उपलब्ध होणारी दारू सर्वांत मोठी अडचण आहे. लाखनी तालुक्यातील अनेक गावांत अवैध दारू विक्री सुरू आहे.गावांतील बहुतांश तंटे दारूमुळेच होतात,हे अनेकदा स्पष्ट झाले आहे.शासनही केवळ महसूल मिळावा म्हणून दारू विक्रीचे परवाने देत आहे.पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीने हातभट्ट्या व अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गावागावांत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्था बिघडून फौजदारी स्वरूपाचे तंटे निर्माण होत आहेत.तरीही शासन स्तरावर जिल्ह्यात दारूबंदीसाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.अनेक गावांत महिलांच्या पुढाकाराने दारूबंदी होते.मात्र कालांतराने परिस्थिती 'जैसे थे'दिसून येते.जो उद्देश समोर ठेवून शासनाने तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना केली,तो उद्देश यशस्वी होण्याकरिता शासनाकडून समिती सदस्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !