लेख...
जात मानसिकता सोडल्याशिवाय बंधुत्वाचे मूल्य कसे रुजणार ?
!! द्रुष्टिकोन !!
विशाल बंडावार यांच्या लेखणीतून...
युवा संकल्प संस्था शाखा-आष्टी प्रमुख
मो.न.7038269125
एस.के.24 तास
'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत... ही प्रतिज्ञा लहान मूल शाळेत पाऊल टाकते तेव्हापासून रोज त्याच्या कानावर पडते. मात्र,शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर 'सारे भारतीय माझे बांधव आहेत,' हे समजायला शिक्षित समाजालाही अनेक वर्षे का लोटावी लागतात? देशातील नागरिकांमधील प्रेम, बंधुत्वाचे नाते उगमत का नसावे ? याला काही अपवाद जरुर आहेत.
परंतु,आज ज्या पध्दतीने समाजात व्देषाचं विष पेरलं जात आहे. जाती,धर्माच्या नावावर माणसांचे मुडदे पाडले जात आहेत,ते पाहता समाज म्हणून आपण २१ व्या शतकातही माणूस आणि माणूसपणाचं महत्त्व आपल्या वारसांना पटवून देऊ शकलो नाही, याकडे कानाडोळा करता येणार नाही. हे जसे समाजव्यवस्थेचे अपयश आहे. तसेच ते शिक्षण व्यवस्थेचेदेखील आहे.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर जातीपातीच्या जोखडात अडकले होते.ज्ञानोबा-तुकोबांच्या बंडखोर संत परंपरेचा वारसा महाराष्ट्राला आहे.
तरीही समाजाचा मोठा घटक असलेल्या उपेक्षित समाजाला विठुरायाच्या दर्शनाची परवानगी नव्हती.खुद्द संत चोखोबांना मंदिरात प्रवेश दिला गेला नव्हता. हा जुलमी अन्याय मोडून काढण्यासाठी साने गुरुजींनी १ मे १९४७.ला चंद्रभागेच्या वाळवंटात आमरण उपोषण केले. साने गुरुजींनी केलेल्या दहा दिवसांच्या उपोषणामुळे विठुमाउलीचे दर्शन सर्वासाठी खुले झाले, हा इतिहास आहे. मात्र,आजही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले म्हणून गोळ्या घातल्या जात असतील, तर हे कशाचे प्रतीक म्हणावे ?...
देश महासत्ता बनण्याची भवितव्य रंगवली जात असताना जातीय अत्याचार रोखण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे. जातीप्रमाणेच धर्माच्या नावावर होत असलेला भेद,सापत्न वागणूक अजून बदलेला नाही.माणसं मारली जात असताना समता,स्वातंत्र्य,बंधुत्व व न्याय ही मूल्य फक्त कायद्याच्या पुस्तकापुरती मर्यादित राहू नयेत.
अत्याचाराच्या घटना घडून नयेत. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करता येणार नाही का? मोठमोठी देवस्थाने उभारुन देश मोठा होत नसतो.सुदृढ समाजाची निर्मिती होणे, किमान त्या दिशेने वाटचाल करणे याला राज्यकत्यानी प्राधान्य द्यायला हवे. यातच सर्वाचं हित आहे, अन्यथा पुस्तकातील प्रतिज्ञा पुस्तकातच राहील...