गोसीखुर्द’मध्ये शंभर टक्के जलसाठ्याचे नियोजन करावे- विभागीय आयुक्तांचे आदेश.
एस.के.24 तास
भंडारा : (मुकेश मेश्राम) गोसीखुर्द प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच या प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रियेबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी आज नागपूर येथे दिले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभा कक्षात विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता प्रकाश पवार, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, गोसीखुर्द प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अंकुर देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
गोसीखुर्द सिंचन प्रकल्प हा महाराष्ट्रातील एकमेव ‘राष्ट्रीय सिंचन प्रकल्प’ आहे. या प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत. कुही तालुक्यातील सोनारवाही गावातील प्रकल्पग्रस्तांना आवश्यक त्या सर्व सुविधा व सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल. येथील ग्रामस्थांना स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत महसूल व जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक लवकरच घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच गोसीखुर्द प्रकल्पासाठी शिल्लक भूसंपादनाचा जिल्हानिहाय आढावा घेवून येत्या सहा महिन्यात भूसंपादनाची बहुसंख्य प्रकरणे मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास श्रीमती लवंगारे-वर्मा यावेळी व्यक्त केला.
गोसीखुर्द प्रकल्पाबाबतची प्रमुख प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आढावा बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गोसीखुर्द प्रकल्पाची कामे पूर्ण झाले असून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 13 तालुक्यात 718 गावांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत 85 गावठाणे बाधित आहेत. त्यांचे पुनर्वसन 63 नवीन गावठाणात करण्यात येणार आहेत. त्यापैकी 61 नवीन गावठाणासाठी सुविधा निर्माण झाल्या असून दोन गावांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रकल्पातील 14 हजार 984 प्रकल्पग्रस्त कुटुंबांपैकी 11 हजार 676 कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत.
गोसीखुर्द धरणात सद्य:स्थितीत 50 टक्के सिंचन क्षमता निर्माण होवून 82 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. या प्रकल्पांतर्गत दोन खाजगी जलविद्युत प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतर करा’ या धोरणावर विकसित करण्यात आले आहे. याद्वारे साडेसव्वीस मेगावॅट उर्जा निर्मिती होत आहे.
गोसीखुर्द प्रकल्पामुळे 1 लाख 24 हजार 658 हेक्टर क्षेत्रावर क्षमता निर्माण झाली आहे. एकूण क्षमता 2 लाख 50 हजार 800 हेक्टर एवढी आहे. यावर शेतकरी धान पीक घेत आहेत. या प्रकल्पाच्या एकूण सिंचनक्षमतेपैकी 49 टक्के क्षेत्राला बंदनलिका वितरण प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याची कामे प्रगतीपथावर आहेत. नागपूर जिल्ह्यात 22 हजार 997 हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात 1 लाख 40 हजार हेक्टर तर भंडारा जिल्ह्यात 87 हजार 648 हेक्टर क्षेत्राला या सिंचन प्रकल्पाचा लाभ होणार आहे.
गोसीखुर्द धरणाची एकूण साठवण क्षमता 1146 दशलक्ष घनमीटर आहे तर प्रकल्पाचा पाणी वापर 1540 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. प्रकल्पाला उजवा व डावा असे दोन मुख्य कालवे आहेत. तसेच बुडीत क्षेत्रातून टेकेपार, आंभोरा, नेरला आणि मोखाबर्डी या चार उपसा सिंचन योजना आहेत. तर कालव्यावर पवनी, शेळी, अकोट, गोसी व शिवनाळा या छोट्या उपसिंचन योजना आहेत. याव्यतिरिक्त आसोलामेंढा ब्रिटीशकालीन सिंचन प्रकल्प हा या प्रकल्पाचा भाग असून या धरणाची उंचीवाढ व कालवे प्रणालीचा विस्तार व सुधारणा यांची कामेही प्रगतीपथावर आहेत अशी माहिती श्री.अंकुर देसाई यांनी यावेळी दिली.