सरपणासाठी गेलेली महिला वाघाचा हल्ल्यात ठार.

     
सरपणासाठी गेलेली महिला वाघाचा हल्ल्यात ठार.


एस.के.24 तास


मुल : ( नितेश मँकलवार ) जळाऊ सरपणासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी सकाळी वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर 526 मध्ये घडली.मृत महिलेचे नाव वैशाली विलास मांदाडे, वय 32,रा.सुशी असे आहे. घटनेनंतर गावक-यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.त्यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. घटनास्थळी वनविकास महामंडळाच्या वरिष्ठ        अधिका-यांनी भेट देवून गावक-यांना शांत केले.



मूल तालुक्यातील सुशी येथील पंधरा ते सोळा महिला जळाऊ लाकडासाठी सोमवारी सकाळी गावापासून अडीच किलो मिटर अंतरावर असलेल्या जुन्या तलावाच्या परिसरात गेलेल्या होत्या. हा परिसर वनविकास महामंडळाच्या चिचपल्ली परिक्षेत्रातंर्गत केळझर बीटात डोंगरहळदी नियत क्षेत्रात कम्पार्टमेंट नंबर 526 मध्ये येतो. हा भाग घनदाट जंगलाचा असून तलावाचा परिसर असल्याने याठिकाणी पटटेदार वाघाचा मुक्त संचार आहे. तलावाच्या परिसरात महिला  जळाउ काडया वेचत असताना त्याचठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने वैशाली विलास मांदाडेवर  हल्ला चढविला. आरडाओरड झाल्याने सरपण वेचणा-या  इतर महिलांनी घाबरून जावून गावाच्या दिशेने धाव घेतली. तो पर्यंत वाघाने फरकटत नेऊन बस्तीस वर्षीय वैशालीला ठार केले होते. घाबरलेल्या महिलांनी गावात येऊन ही माहिती देताच गावक-यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेवून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. यावेळी गावक-यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनविकास महामंडळाचे वनसंरक्षक सोनूलवार आणि चिचपल्ली परिक्षत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एल. पिंजारी यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली.



 पंचनाम्यानंतर मृतक वैशाली मांदाडे हिच्या कुटुंबियांना तात्काळ पंचवीस हजार रूपयाचे सानुग्रह अनूदान दिले.या घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी व्हि.एल.पिंजारी करीत आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी जळावू लाकडाची साठवणूक केली जाते. जंगलात जावून लाकडे आणणेच महिलेच्या जीवावर बेतले.वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची मूल तालुक्यातील ही चौथी घटना आहे.यानिमित्ताने मानव वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा समोर आले आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !