परदेश शिष्यवृत्ती अर्जासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ.
एस.के.24 तास
चंद्रपूर : अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्यत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएचडी) अध्ययन करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आर्थिक मदत करण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरीता विद्यार्थ्यांकडून परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जून 2021 पर्यंत होती. यात शासनाने मुदतवाढ दिली असून सदर मुदतवाढ दि. 30 जून 2021 पर्यंत आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत परदेशात अध्ययनासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पदव्यत्तर पदवी आणि पीएचडीसाठी जागतिक स्तरावर तीनशेच्या आतील रॅंकमध्ये परदेशात शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाची प्रत डाऊनलोड करून हा अर्ज swfs.applications.2122@gmail.com या मेलवर दि. 30 जून 2021 पर्यंत पाठवावा. तसेच अर्जाची हार्डकॉपी पोस्टाद्वारे समाजकल्याण आयुक्तालय, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे-411001 या पत्त्यावर सादर करावे.
या योजनेच्या अटी, शर्ती व लाभाचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच अनुज्ञेय असतील. अर्जाचा नमूना व सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर रोजगार या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे आयुक्त,डॉ. प्रशांत नारनवरे, व नागपूर,समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.