एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये रात्री उशीरा झालेल्या चकमकीमध्ये 13 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार,आतापर्यंत 6 नक्षल्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. गडचिरोलीचे DIG संदीप पाटील यांनी याविषयी पुष्टी केली आहे.
सध्या C-60 कमांडोज आणि नक्षल्यांमध्ये थोड्या-थोड्या वेळाने फायरिंग सुरूच आहे.
पाटील यांच्या माहिती नुसार, 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह महाराष्ट्र-छत्तीसगड बॉर्डरवरील गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीच्या कोटमी च्या जंगलामधून ताब्यात घेण्यात आले आहेत.
29 मार्चला मारले गेले होते 5 नक्षलवादी.
यापूर्वी टॅक्टिकल काउंटर अफेंसिव्ह कँपेन (TCOC) साठी जमा झालेल्या नक्षलवाद्यांसोबत गडचिरोली पोलिसांची 29 मार्चला चकमक झाली होती. यामध्ये कुख्यात नक्षली रुसी राव सह पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या एन्काउंटरच्या विरोधात नक्षलवाद्यांनी 12 एप्रिलला गडचिरोली बंदची हाक दिली होती. 12 एप्रिलला अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांनी रोड कंस्ट्रक्शनमध्ये लावलेल्या मशीन पेटवून आपला विरोध दर्शवला होता.
कोण आहे C-60 अँटी नक्षल कमांडो
गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून संपूर्ण भागात नक्षलवादी कारवाया वाढल्या आहेत. यावर बंदी घालण्यासाठी तत्कालीन एसपी केपी रघुवंशी यांनी 1 डिसेंबर 1990 रोजी C-60 ची स्थापना केली. त्यावेळी या सैन्यात केवळ 60 खास कमांडो भरती करण्यात आले होते, ज्यामुळे हे नाव पडले. नक्षलवादी कारवाया रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हा दोन भागात विभागला गेला. पहिला उत्तर विभाग, दुसरा दक्षिण विभाग.
सी -60 कमांडो प्रशासकीय कामेही करतात.
या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिले जाते. दिवस आणि रात्र केव्हाही कारवाई करण्यासाठी त्यांना ट्रेंड केले जाते. त्यांचे प्रशिक्षण हैदराबाद, NSG कॅम्प मनेसर, कांकेर, हजारीबाद येथे होते. नक्षलविरोधी अभियानाव्यतिरिक्त हे जवान नक्षलवाद्यांच्या कुटूंब, नातेवाईकांना भेटून त्यांना सरकारच्या योजनांविषयी माहिती देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणतात. ते नक्षलग्रस्त भागातील प्रशासकीय अडचणींबद्दल माहिती गोळा करतात.