शैक्षणिक अहर्ता नसतांना केली गटसचिव पदी नियुक्ती.
◆ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांचा अफलातून कारभार.
◆ प्रकरण - विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जांभळी/सडक येथे गटसचिव नियुक्तीचे.
नरेंद्र मेश्राम ! जिल्हा प्रतिनिधी ! भंडारा
लाखनी : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत गटसचिव नियुक्त करण्याबाबद ठराव पारित करावयाचे दिवशी नियुक्त गटसचिवाकडे एमएससीआयटी आणि सीएएस हे रेकॉर्ड लिहिण्याचे अनुभव प्रमाणपत्र असणे अनिवार्य असल्याची सहकार कायद्यात तरतूद असली तरी त्यास बगल देऊन हे प्रमाणपत्र नसलेल्या व्यक्तीची निवड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जांभळी/सडक येथे केल्याची माहिती असूनही जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांनी प्रस्तावास मंजुरी प्रदान केल्याने जिल्हा उपनिबंधकाचा अफलातून कारभार चव्हाट्यावर आला आहे.
"बिना सहकार नाही उद्धार" हे तत्त्व अंगिकारून जिल्ह्यातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. संचालक मंडळास कायदेशीर सल्ला देण्यासाठी गटसचिवाची नेमणूक करण्यात आली. शेतीस पूरक व्यवसायाकरिता अर्थपुरवठा करणे. तसेच धान पिकासाठी पीक कर्ज देणे. हे या संस्थेचे प्रमुख काम आहे. पण रिक्त गटसचिवाच्या जागा भरल्या गेल्या नसल्यामुळे एकच गटसचिवाकडे ५ ते १० संस्थांचा कार्यभार असल्यामुळे "एक ना धड भाराभर चिंध्या" असा प्रकार सुरू असल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने अनुभवी व्यक्तीची सहकारी संस्थेच्या ठरावान्वये गट सचिव पदी नियुक्तीचा ठराव पारित करून त्यास जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी मंजुरी प्रदान करावी. अशी कायद्यात तरतूद करण्यात आली.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित जांभळी/सडक नोंदणी क्रमांक १२५१ येथील कारभारही प्रभारी गटसचिवाकडेच असल्याने कामकाज करतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे प्रभारी गट सचिव एच. एम. ढेंगे यांनी ३१ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाचे सभेत ठराव क्रमांक ८ नुसार धनपाल राऊत यांची गट सचिव पदी निवड करण्यात यावी. असा ठराव पारित करून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांचेकडे प्रस्ताव पाठविला. गटसचिव पदी नियुक्त व्यक्तीकडे आवश्यक शैक्षणिक अहर्ता तथा एमएससीआयटी आणि सीएएस हे रेकॉर्ड लिहिण्याचे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक होते. पण धनपाल राऊत यांनी एमएचसीआयटी ची परीक्षा १० डिसेंबर २०२० रोजी दिली. तथा ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सीएएस हे प्रमाणपत्रही त्यांचेकडे नसल्याचे उपनिबंधक यांचेकडे पाठविलेल्या प्रस्तावातील दस्ताऐवजात नमूद असल्याने ठरावाचे दिवशी धनपाल राऊत यांचेकडे गटसचिव पदास आवश्यक ती शैक्षणिक अहर्ता नसतांना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा यांनी अर्थकारण करून आदेश क्रमांक जीऊनी/वि १/वैद्य/स्वाय/गटसाचिव/नियुक्ती/श्री. राऊत/१४६०/२०२१ दिनांक ३० मार्च २०२१ नुसार गटसचिव प्रस्तावास मंजुरी प्रदान केल्याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचा अफलातून कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.