कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरला माजी आमदार पुत्राकडून मारहाण व्हिडीओ व्हायरल.
◆ डॉ.मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन दाखल केली तक्रार.
सुरेश कन्नमवार मुख्य संपादक - एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी तालुका ठिकाणी
नेते तथा आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लाॅरेन्स गेडाम याने येथील सरकारी कोविड रुग्णालयातील डॉ.अभिजित मारबते यांना मारहाण केली. गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासाठी गोळ्या देण्यावरून ही बाचाबाची झाली आणि नंतर मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथील बर्डी भागात असलेल्या कोविड केअर सेंटरवर बुधवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास लॉरेन्स गेडाम आपल्या गृहविलगी करणात असलेल्या नातेवाईकाची औषधे (गोळ्या) घेण्यासाठी गेले होते. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी गोळ्या दिल्या, पण यावेळी अतिरिक्त गोळ्या देण्यावरून कर्मचारी आणि नोडल अधिकारी डॉ. अभिजित मारबते यांच्याशी बाचाबाची झाली. यावेळी लॉरेन्सने शिवीगाळ करत डॉ.मारबते यांना मारहाण केली.
या प्रकारानंतर डॉ. मारबते यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली.रात्री १० वाजेपर्यंत यासंदर्भात जबाब घेणे सुरुच होते.दरम्यान माजी आमदारपुत्र लॉरेन्स पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जात असल्याची माहिती पोलीस अधिक्षक,अंकित गोयल यांनी दिली.