पुण्यश्लोक,अहिल्यादेवी होळकर एक दिव्य अवतार.
श्री.खेमदेव कन्नमवार यांच्या लेखणीतून...
एस.के.24 तास
मराठी अस्मिता जागृत करून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला पुढे वाहून नेण्याचे कार्य खऱ्या अर्थाने जर कोणी केले असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी. इतिहासाची पाने पालटून पाहिले असता अनेक संत,महापुरुष,राजे निष्ठावंत सरदार, कर्तृत्ववान राणी,महाराणी यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्ता,अद्वितीय कार्यकुशलतेने भारताच्या इतिहासाला समृध्द केलेले आहे.भारताच्या पुरुष प्रधान संस्कृती मध्ये काही महिला आहेत ज्या स्वकर्तुत्वाने इतिहासात अजरामर झालेल्या आहेत.त्यांचा उल्लेख केला नाही तर इतिहास पूर्ण होणार नाही.त्यातीलच एक स्त्री म्हणजे राणी राजमाता अहिल्याबाई होळकर या आहेत.
अहिल्याई एक उत्तम शासक व संघटक होत्या.अहिल्याईचा शासन काळ एक स्वप्नवत काळ होता.जनतेला कायद्याचे पाठबळ होते म्हणून जनतेचे राज्य होते, जनतेची भरभराट होती.
अहिल्याईच्या या कार्याने त्यांच्या जीवन काळात त्यांना मानसन्मान मिळाला त्यांच्या पश्चात सुद्धा जनतेने संत म्हणून संबोधले.अहिल्याई एक दिव्य अवतार होती.
संत परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राच्या पावन भूमीत अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या लहानशा गावातील धनगर जमातीचे माणकोजी शिंदे व सुशिलाबाई यांच्या पोटी ३१ मे १७२५ रोजी अहिल्याईचा जन्म झाला.अहील्याईला महादजी व शहाजी हे दोन भाऊ होते.वडील गावातील पाटील व प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे अहिल्याईला सर्व सुविधा मिळाल्या.आई वडीलानी मुला मुलींमध्ये भेदभाव न करता अहील्याईला लिहायला वाचायला शिकविले.आईवडील धर्मपारायान करणारे असल्यामुळे लहानपणापासूनच धार्मिक विचारांचा प्रभाव होता.अहिल्याई कुशाग्र बुद्धिमत्तेच्या असल्यामुळे शस्त्रविध्या, शास्त्रविद्या सोबतच सुसंस्कार, जीवनमूल्ये यांचे शिक्षण घरूनच मिळाले.
अहील्याईच्या गावात शिक्षणाची सोय नव्हती तसेच त्या काळात मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती.
गोरी गोमटी,गोल चेहऱ्याची,चुणचुणीत अहील्याई आपल्या समवयस्क मुला मुलींसोबत शेतात,
नदीकाठी,आमराईत खेळायला जात असे.आळसात बसून राहणे तीला आवडत नव्हते म्हणून ती आईला घरकामात मदत करण्या सोबतच वडील पाटील असल्याने गावात न्यायनिवाडा करणे,सल्ला देणे, सरकारी काम पाहणे अश्या कामात वडीलाला मदत करायची.सोबतच गाईं,मेंढ्या राखणे,शेतावर जाणे हे काम सुद्धा आवडीने करायची.
अहिल्याईला शिक्षणाची आवड असल्याने ती खेळण्या बागळण्या सोबतच धार्मिक,आध्यात्मिक, प्रबोधनात्मक विषयाची पुस्तके वाचीत असे,धार्मिक विचारांचा प्रभाव असल्याने ती महादेवाची उपासक होती. गावशेजारील महादेवाच्या मंदिरात पूजापाठ करणे हा तिचा नित्यक्रम होता.अहिल्याई समवयस्क मुलींमध्ये कमालीची हुशार,बोलण्यात पटाईत तसेच कोणत्याची प्रसंगाला न डगमगता सामोरे जाण्यास तयार असे.संस्कारक्षम परंतु साधारण कुटुंबातील जडणघडणीत वाढलेली आहिल्याई पुढे एक कर्तृत्ववान राणी म्हणून जगात कीर्ति करेल असे भाकीत कोणी केले असते तर ती अतिशयोक्ती वाटली.
नभ मंडल हे उजळून गेले,
सूर्याच्या तेजाने.
तसेच माते अहिल्या
उजळले तुझे जीवन,
यश आणि किर्तीने.
अहील्याईच्या जीवनात विधात्याला असेच काहीशे घडवयाचे असेल म्हणून असा एक घटनाक्रम घडला व अहिल्याई आणि इंदौरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांची अनपेक्षित भेट घडून आली. तिच्या बोलण्यातील धिटाई,धाडस आणि माधुर्य मल्हारराव होळकरांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. ८ वर्षाच्या चिमुरडीच्या अंगभूत गंधाने मल्हारावांना इतके आकर्षित केले की त्यांनी आपली सून म्हणून तिचा स्वीकार करण्याचे ठरविले.अश्या प्रकारे इ. स.१७३३ मध्ये मल्हारराव होळकर यांचे एकुलते एक सुपुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
शुर, स्वामिनिष्ठ,कुटुंबवत्सल सासरे लाभल्यामुळे अहील्याईला कर्तुत्वाची पार्श्वभूमी लाभली.सुभेदार मल्हारराव यांच्या मार्गदर्शनात व छत्रछायेखाली अहील्याईच्या कलागुणांना वाव मिळाला.अहील्याईला पतीसुख जास्त लाभले नाही.१९ मार्च १७५४ ला कुंभेरीच्या लढाईत पती खंडेराव यांना सूरजमल जाठानंच्या करवी विर मरण आले.पतीला वीर मरण आले तेव्हा मुलगा मालेराव १० वर्षाचा तर मुलगी मुक्ता ७ वर्षाची होती.तेव्हाच्या प्रथेप्रमाणे पती मरणानंतर पत्नी सती जाण्याची प्रथा होती.परंतु सासरे मल्हारराव यांनी अहील्येला सती जाण्यापासून परावृत्त केले. अहिल्याई सती न जाता मानवतेला काळीमा फासणारी सतीप्रता बंद केली.
अहिल्याईला अनेक कौटुंबिक संकटाना सामोरे जावे लागले.संकटांची मालिका सुरू असताना सुद्धा अहिल्याईने आपल्या कार्य कुशलतेने प्रत्येक संकट योग्य प्रकारे हाताळले. सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर पितृछाया हरपल्याने ती एकाकी झाली परंतु न डगमगता संपूर्ण राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन कारभार चोखपणे बजावले.
त्यांचा विश्वास होता की " ज्या मनगटात बळ,बुद्धि आणि चातुर्य आहे तोच स्व कर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो." कितीतरी प्रसंगावर चातुर्य व हिमतीने मात करून अहिल्याईने परकीय तसेच अंतर्गत शत्रूंना आपल्या काबूत ठेवले होते.यावरून त्यांची मुत्सद्देगिरी,कर्तबगारी,चतुरस्त्र बुध्दी, लढावू बाणा,युद्ध तंत्र,गनिमी कावा तसेच प्रजाहितदक्षता यावरून त्यांच्या कुशल प्रशासनाची ओळख होते.
स्वभावाने मधुर आणि प्रेमळ
प्रसंगी आणे मनगटात बळ
अबाधित राखला स्वराज्याचा गड
प्रजेच्या होत्या त्या आधारवड!
लहानपणी आई वडील यांच्या कडून मिळालेली संस्कारांची शिदोरी घेऊन व नीतीचा आधार घेत अहिल्याईने आपल्या २८ वर्षाच्या राज्यकारभारात अनेकानेक लोकोपयोगी,कल्याणकारी योजना आखल्या व अमलात आणल्या.आहील्याईला व्यक्तींची पारख चांगली होती.
त्यांनी प्रामाणिक,कर्तबगार व हरहुन्नर अधिकाऱ्यांची नेमणूक केली.अहिल्याई धार्मिक वृत्तीच्या असल्यातरी त्या अंधविश्वासू,धर्मांध नव्हत्या.प्राणिमात्रांच्या प्रती त्यांच्या मनात आपुलकी, जिव्हाळा,प्रेम होते.पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण केले पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा यावरून त्यांचा दूरदृष्टीकोण अधोरेखित होतो.
अहील्याई आपल्या प्राचीन संस्कृतीच्या अभिभावक होत्या त्यामुळे त्यांच्या मनात रामराज्याची संकल्पना अस्तित्वात होती म्हणून राज्यकारभार हा लोकांसाठी असावा.लोकांचे कल्याण हेच राजाचे आद्य कर्तव्य आहे.या भावनेतून त्यांनी आपल्या राज्यकारभाराची दिशा निर्धारित केली व अनेक लोकोपयोगी कामे केली.
१)जल संवर्धनाची गरज आज प्रकर्षाने जाणवत आहे.ही बाब अहील्याईने त्या काळात हेरले होते म्हणूनच येणारे जाणारे वाटसरू तसेच मुक्या प्राण्यांसाठी पाणवठे तयार केले.शेतीसाठी स्वखर्चातून तलाव,विहिरी बांधल्या तसेच पाण्याची गरज ओळखून त्याचे पुनर्भरण व्हावे या दृष्टीने झाडे लावणे त्यांचे संवर्धन करणे हे त्यांच्या राज्यकारभारातील नीतीचा एक भाग होता.
२) गरीब,अपंग,वृध्द,अनाथ लोकांची आभाळ होते हे ओळखून तीर्थक्षेत्री अन्नछत्रे सुरू केले.
३) नदीवर स्नानासाठी,कपडे धुण्यासाठी व इतर कामांसाठी नादिघाट बांधले तसेच महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली.
४) बाह्य व अंतर्गत शत्रूंना नामोहरम करण्यासाठी तसेच जलद प्रशासनासाठी संदेश वहन लवकर व खात्रीपूर्वक व्हावे या उद्देशाने महेश्वर ते पुणे टपाल सेवा सुरू केली.
५) राज्यकारभार चालविण्यासाठी पैशाची गरज असते त्याकरिता महसूल हा एक मुख्य स्त्रोत्र असतो परंतु गावातील महसूल गोळा करणारे गरिबांकडून अनावश्यक किंवा अवाजवी महसूल गोळा करीत तसेच महसूल सरकार दरबारी जमा न करता परस्पर खर्च करीत.महसूल गोळा करण्यात सुसूत्रता यावी यासाठी पगारी कोतवाल नियुक्त केले.
गावातील वाद गावातच सामोपचाराने मिटविणे गरजेचे असते त्याकरिता तंटामुक्ती समित्यांची निर्मिति केली.
६) अहिल्याईचा धर्मशास्त्र,नीतिशास्त्र,राज्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास होता.तसेच शिक्षणाचे महत्व माहीत होते म्हणून त्यांनी ग्रंथालय बांधले व पुस्तकांची व्यवस्था केली.
७) सतीप्रथा या सारखी स्त्री अन्यायकारक प्रथा बंद केली.
८) मुलींना शिक्षण,प्रशिक्षण घेण्याची तरतूद केली.मुलींची स्वतंत्र सैनिक तुकडी तयार केली.मुलींना,स्त्रियांना समाजात प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून देणारे गृहउद्योग सुरू केले.
९) अनेक धार्मिक स्थळांना भेट देऊन मंदिर,मशिद,दर्गे त्यांची डागडुजी,जीर्णोद्धार करविला.
१०) शेतकऱ्यांना आर्थिक मदत,दुष्काळाच्या काळात महसूलात सूट किंवा माफी दिल्या गेली.विणकरांना राजाश्रय देऊन त्यांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध करून दिले.
असे अनेक कल्याणकारी व लोकाभिमुख योजना स्वतःच्या वैयक्तिक संपत्ती मधून राबविले म्हणून खऱ्या अर्थाने त्या पुण्यश्लोक ठरल्या.
शिवाजी महाराज ज्या प्रमाणे पुरुषांमध्ये उत्तम राजे होते तसेच स्त्रियांमध्ये अहिल्याई एक उत्तम राज्यकर्ती होत्या.आपल्या असामान्य बुद्धिमत्ता,कार्यकुशलता,चातुर्य,धाडसी वृत्ती,वैचारिक प्रगल्भता,प्रेम,आपुलकी जिव्हाळा या बळावर त्या रयतेच्या मनामध्ये अधिराज्य गाजवत होत्या.अशी अहिल्याई एक महान योध्दा, महान तपस्वी स्त्री,तत्वज्ञानी शासक होती.
उदय आणि अस्त हा प्रकृतीचा नियम आहे. प्रत्येक सजीव अनंतात विलीन होतो तो नवसृजनाच्या निर्मितीसाठी.याच निसर्ग नियमानुसार १३ ऑगस्ट १७९५ रोजी एक तेजोमय तारा निखळला.स्वतःचे अस्तित्व जनमानसाच्या मनामनात
पराक्रमी,प्रजाहितदक्ष,कल्याणकारी पुण्यशिल,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर हे बिरूद मिरवत दिमाखाने इहलोकीची जीवन प्रवास पूर्ण केला.
गौरवोद्गार :-
१) निजाम हैदराबाद - Definitely no woman and no ruler is like Ahilyabai Holkar.
२) शाहीर प्रभाकर -
धन्य धन्य कलियुगी देवी अहिल्याबाई ,
गेली कीर्ति करुनिया भू मंडलाचे ठाई ,
महाराज अहिल्याबाई पुण्यप्राणी.
संपूर्ण स्त्रियांमध्ये श्रेष्ठ रत्नखाणी.
लेखक / कवी - श्री.खेमदेव कन्नमवार ऊर्जानगर,चंद्रपूर संपर्क :- ९४२१७२४३६३