राष्ट्रीय महामार्ग बनवताय की नाला? नागरिकांचा संतप्त प्रश्न.
● सबंधित विभाग व कंत्राटदार यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
एस.के.24 तास
सावली : ( सुरेश कन्नमवार ) मागील काही वर्षांपासून येथील व्याहाड खुर्द ते सावली राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम सुरू असून हे बांधकाम नागरिकांसाठी सातत्याने त्रासदायक ठरत आहे. आता पावसाळा जवळ येत असताना या मार्गाच्या बाजूला नालीचे बांधकामासाठी समांतर खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस आला की, या खोदाकामातून घाण पाणी वाहायला लागते. त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय महामार्ग बनवताय की, नाला, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
व्याहाड खुर्द ते सावली या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कंत्राटदाराने एक वर्षापूर्वी व्याहाड खुर्द च्या गावालगत रस्त्याच्या एका बाजूने नालीचे बांधकाम काम पूर्ण केले. त्यानंतर वर्षभरानंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूतील नाली बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने महामार्गाला लागून असलेल्या वार्ड नं. चार मधील गावात जाणारा रस्ता खोदून ठेवला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, गेल्या तीन महिन्याभरापासून हे काम बंद आहे.
खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यातून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. कंत्राटदाराने रस्ता खोदल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून नागरिकांना गावातील बाजारपेठ, पेट्रोल पंप, दवाखाना तसेच सावली येथे शासकीय कामाकरिता जावे लागत असल्याने रस्ता खोदल्यामुळे नागरिकांना डोकेदुखी होत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेक दुचाकीचे अपघात होऊन चालकांना दुखापत तर काही जणांचा जीवही गेला आहे. अशातच अवजड वाहनांमुळे दुचाकीधारकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेष म्हणजे या मार्गाचे काम सुरू झाल्यापासूनच हा मार्ग नागरिकांसाठी एक कटकट झाला आहे.
सध्या खरीप हंगामाला सुरुवात होत असून नागरिकांनी शेतीच्या कामाला सुरुवात करीत आहेत. परंतु रस्त्याअभावी बैलबंडी,ट्रॅक्टर यामध्ये शेती उपयुक्त साहित्य नेणे कठीण होत आहे. या संथगतीच्या बांधकामामुळे नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. अनेक ठिकाणी नालीचे बांधकाम हे पूर्ण झालेले आहे. परंतु या नालीतील असलेली बाजू हि लेव्हल पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्धवट बांधकामातून वाट काढत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
हा मार्ग सातत्याने डोकेदुखी ठरत असतानाही सबंधित विभागाचे या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सदर बांधकाम उत्कृष्ठ चालू आहे का याचे सर्वेक्षण करण्या करीता सर्वेअर असतांनाही सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिक याबाबतीत आश्चर्य व्यक्त करीत आहेत. बऱ्याच ठिकाणी रोडचे काम पूर्ण झाले. परंतु ते निकृष्ठ व कच्च्या स्वरूपाचे झाल्याने तेच काम परत खोदून बनविण्यात येत आहे. त्यामुळे जनतेला अधिकच त्रास होत आहे. अशा प्रकारचे काम किती दिवस चालणार असे प्रश्न जनता करीत आहे. सदर काम कंत्राटदार व सबंधित विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा नाली बांधकाम करीता खोदकाम केलेले व नागरिकांना अडसर ठरत असलेले काम पूर्ववत पद्धतीने बुजविण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे.