दारूचे दुकान शहराबाहेर स्थानांतरीत करण्यासाठी तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदने.
एस.के.24 तास
सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय दिनांक २७/०५/२०२१ ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता संपूर्ण जिल्ह्यात देशी-विदेशी दारूची दुकाने आता येणाऱ्या १० -१५ दिवसात सुरु होतील. सावली शहरातील जुनी देशी दारूची दोन दुकाने बस स्थानकाच्या मागे सन्मित्र चौक मध्ये आणि मेडिकल चौक येथे अशा दोन देशी दारूच्या भट्टी मागील अनेक वर्षापासून सुरु होत्या.परंतु चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यामुळे देशी दारूच्या भट्टी बंद होत्या. आता पुन्हा भट्टी चालू होत असल्यामुळे परिसरातील महिला व लहान मुले यांना नाहक त्रास होणार आहे. दारू भट्टी चौकातल्या मुख्य मार्गावर असल्यामुळे चौकात जातांना महिला व लहान मुलांना दारुड्या लोकांचा त्रास होणार आहे. मुख्य रस्तावर दारुडे लोकं दारू पिऊन पडून असतात तसेच शिवीगाळ करीत असतात त्यामुळे जाणार्या-येणाऱ्या व्यक्तींना नाहक त्रास होतो. हा नाहक त्रास होऊ नये म्हणून सावली शहरातील दोन्ही देशी दारूच्या भट्टी सावली शहरापासून १ किमी अंतरावर सुरु कराव्या अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.
सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे, तसेच सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राठोड साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मच्छिमार सोसायटी अध्यक्ष,कैलास शिंदे,माजी नगरसेवक शिलाताई शिंदे,समाजसेविका मानसी लाटेलवार, सामाजिक कार्यकर्ता,रुपचंद लाटेलवार,समाजसेवक प्रवीण दुर्गे,युवा कार्यकर्ते वैभव भशाशंकर इत्यादी उपस्थित होते.